महाराष्ट्रराजकारण

पंढरपूर आंदोलन: प्रकाश आंबेडकर यांच्यासह हजार ते बाराशे जणांवर गुन्हा दाखल

लॉकडाऊनच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत पंढरपुरात आंदोलन केलं. त्यानंतर आठ दिवसांत नियमावली तयार करुन मंदिर खुली केली जातील असं आश्वासन मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह हजार ते बाराशे जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल मंदिर खुलं करा, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी काल पंढरपूर विठ्ठल मंदिरासमोर हजार ते बाराशे लोकांच्या जमाव जमवून आंदोलन केले. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान राज्यसरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना प्रकाश आंबेडकर यांनी 1100 ते 1200 लोकांचा जमाव जमवला. यावेळी मास्क घातला नाही तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.