आंतरराष्ट्रीय

बालकांचे लैगिक शोषण करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा

Newslive मराठी-  लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करत मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून मृत्यूदंडाच्या शिक्षेला परवानगी दिली आहे.

पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

१२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने पॉस्को कायद्यात बदल केले असून यापुढे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.