महाराष्ट्रराजकारण

लढतो आहोत, हरणार नाही! पंतप्रधानांसमोर मुख्यमंत्र्यांचा निर्धार

सध्या कोरोनामुळे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. संसर्ग रोखण्यात एक किंवा दोन दिवसांची टाळेबंदी परिणामकारक ठरतीय का, याचा फेरआढावा घ्यावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेमुळे येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि रुग्णवाढीचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल,’ असे मोदींना सांगितले.

आम्ही लढतो आहोत, हरणार नाही, असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींबरोबर मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत आढावा घेतला.

उद्धव ठाकरे यांच्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब , तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी मोदी म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी आणि व्यवहारही सुरु ठेवण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांवर अधिक लक्ष दिले जावे. राज्यांनी चाचण्या, रुग्ण शोध, उपचार, निरीक्षण याचा प्रभावी वापर करतानाच जनतेमध्येही जागरुकता निर्माण करावी.

लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आणून देताना मोदींनी जनतेमध्ये चाचण्यांबाबत अफवा पसरणार नाहीत, याची काळजी घेण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांना दिला. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत असल्याचे सांगितले आहे.