महाराष्ट्रराजकारण

“प्रवीण तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्यांनी संविधानाचा अपमान केलाय”

अनेक कलाकार मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत. गणपतीची प्रतिष्ठापना करताना मूर्तीखाली संविधानाची प्रत ठेवल्यानं अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सोशल मीडियावर ट्रोल झाले. अनेकांनी तरडेंवर टीका देखील केली. त्यानंतर तरडेंनी त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट करत आपल्या हातून चूक झाल्याचं मान्य केलं. मात्र हा वाद शमलेला नाही. तरडे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा थेट इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (खरात) देण्यात आला आहे.

प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी संविधानाच्या प्रतीवर गणपती बसऊन लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी ही विनंती, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्यांनी या ट्विटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराज देसाई यांना मेन्शन केलं आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे. तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारादेखील खरात यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे.
त्यामुळे हा वाद अजून पेटण्याची शक्यता आहे.