कोरोनादेश-विदेश

पर्यूषण पर्वासाठी तीन जैन मंदिरांत प्रार्थनेस मुभा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Newsliveमराठी – मुंबईतील तीन जैन मंदिरे पर्यूषण पर्वातील प्रार्थनेसाठी दोन दिवस २२ आणि २३ ऑगस्टला खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाने काल परवानगी दिली आहे. हा हंगामी निकाल फक्त पर्यूषण पर्वासाठी असून मुंबईतील अन्य धार्मिक सोहळ्यांसाठी विशेषत: गणेशोत्सवासाठी तसेच धार्मिक स्थळांसाठी लागू नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरात प्रार्थनेसाठी परवानगी देताना करोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या पीठाने दिले. जैन पर्यूषण पर्व २३ ऑगस्टला समाप्त होत आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणतीही धार्मिक स्थळे खुली न करण्याचे धोरण राज्य सरकारने कायम ठेवले आहे. मात्र, जैन समाजासाठी महत्त्वाची धार्मिक परंपरा असलेल्या पर्यूषण पर्वाच्या काळात जैन मंदिरे खुली करावीत यासाठी श्वेतांबर मूर्तिपूजक ट्रस्टच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवल्याने ट्रस्टने त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नियमांचे पालन करून सोहळे आयोजित करण्यास परवानगी का नाकारायची? पुरीमध्ये जगनाथ रथयात्रेला परवानगी दिली होती. जगन्नाथाने आम्हाला माफ केले, आताही आम्हाला माफी मिळेल, अशी टिप्पणी न्या. बोबडे यांनी केली आहे.