महाराष्ट्रराजकारण

प्रणव मुखर्जींच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. दिल्लीमध्ये लष्कराच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पार्थिवावर आज दिल्लीमध्ये लोधी स्मशान घाटावर दुपारी २.३० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अन्य नेत्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधानांनी मुखर्जी यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले.

देशाच्या विकासात मुखर्जी यांचे मोठे योगदान होते.केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर ७ दिवसांच्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पश्चिम बंगाल सरकारनेही देखील १ सप्टेंबर रोजी दुखवटा जाहीर केला आहे. येथील सर्व सरकारी कार्यालये आज बंद राहणार आहेत.

प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रणव मुखर्जी यांना २६ जानेवारी २०१९ रोजी भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते. काँग्रेस पक्षात गेले अनेक वर्षे त्यांचे मोठे योगदान होते. अनेक पदांवर त्यांनी काम केले होते.