राजकारण

आरोग्य सेवेला प्राधान्य – मुख्यमंत्री

Newsliveमराठी – आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेडय़ापाडय़ांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.

स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.

शेतकऱ्यांना सततच्या कर्जाच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.