देश-विदेशराजकारण

महाराष्ट्र पोलिसांचं नाव बदनाम करण्याचं कार्य केल्याबद्दल भाजपा नेत्यांना साष्टांग दंडवत – रोहित पवार

Newsliveमराठी – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह इतरांविरुद्ध पाटणा येथे नोंदवण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने काल मंजुरी दिली आहे. मुक्त, सक्षम आणि निष्पक्ष तपास ही काळाची गरज असल्याचे नमूद करतानाच, हा तपास सीबीआयला सोपवण्यास मान्यता देण्यासाठी बिहार सरकार पात्र आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

“सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना साष्टांग दंडवत,” असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला. “आधी ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.