कोरोनामहाराष्ट्र

पुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता, पण…- अजित पवार

देशात सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जनता जनता कर्फ्यूू लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, त्याला माझी सहमती असेल. परंतु उद्योग धंद्यावर परिणाम झालेला मला चालणार नाही, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यामुळे सध्या तरी पुण्यात लाॅकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाचा वाढता प्रर्दुभाव लक्षात घेऊन गुरूवारी मुंबई शहरात 144 कलमानुसार संचारबंदी लागू केली. त्यानंतर मुंबई सारखीच संचारबंदी पुण्यात देखील लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाल्या.

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. याबाबत पवार यांच्या बैठकीत पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी मुंबईमध्ये 144 कलम लागू केले आहे त्या धर्तीवर पुण्यात देखील काय निर्णय घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली.