महाराष्ट्रराजकारण

राजनाथ सिंहांचा चीनला इशारा; मोठं पाऊल उचलावं लागलं तर मागे हटणार नाही

भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावर संसदेत भाष्य केलं. भारत चीन वाद अजून सुटलेला नाही. दोन्ही देशांचा वेगवेगळा दावा असल्याने ही स्थिती गंभीर बनली आहे. चीनने सध्याची सीमा मान्य करण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे चीनच्या कुरापती सुरु आहेत. मात्र, चिनी सैन्याच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्यास भारतीय सैन्य तयार आहे, असं ते म्हणाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरची जमीन मोठ्या प्रमाणावर चीनला देण्यात आली आहे. मे महिन्यात चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला.

त्यानंतर १५ जून रोजी लडाख प्रांतात चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झडप झाली. यात भारताच्या २० जवानांना विरमरण आलं. मात्र, भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना सडेतोड उत्तर दिलं. चीनला कुरापती करू नये असा इशारा देण्यात आला. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण करण्यावर सहमती दर्शवली आहे, असंही सिंह म्हणाले.

जिथं संयम हवा होता तिथं संयम ठेवला आणि जिथं शौर्य दाखवायचं होतं तिथं शौर्य दाखवलं आहे. आपले जवान सीमेवर देशाला सुरक्षित ठेवण्याचं कर्तव्य पार पाडत आहेत. त्यावर कोणी शंका उपस्थित करू नये. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवताना संवेदनशीलता ठेवणंही आवश्यक आहे. चीनसोबत सातत्याने चर्चा केली जात आहे. दोन्ही देशांनी एलएसीवर प्रोटोकॉलचं पालन करावं. सर्व करार आणि सामंजस्याचं पालन दोन्ही देशांनी करायला हवं, असं संरक्षणमंत्री म्हणाले.