महाराष्ट्रराजकारण

राजू शेट्टी हा शेतकऱ्यांनी सोडून दिलेला रेडा; सदाभाऊ खोत यांची जिभ घसरली

Newslive मराठी- राज्यभरात भाजपाकडून आज दूध दरवाढ आंदोलन सुरू आहे. एकीकडे भाजपाचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली आहे.

खोत यांच्या टीकेला शेट्टी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरीच न दिसल्यानं सदाभाऊ खोत भ्रमिष्ट झाल्याचा पलटवार शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टी भ्रमिष्ट झाल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरसंधान साधलं. राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झाला आहे. हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे.


प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे, अशा शब्दांमध्ये खोत यांनी शेट्टींवर घणाघाती टीका केली. सदाभाऊ खोत दोन वेळा खासदार करायला त्या रेड्याबरोबर होता.
त्यामुळे लगेच पोटात गोळा आला, अशा शब्दांत खोत यांनी शरसंधान साधलं. आता आंदोलन कशासाठी करता? तुम्हीच सरकारमध्ये आहात. तुम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. मग द्या ना शेतकऱ्याला न्याय मिळवून. आंदोलनाची नाटकं कशासाठी करता?, असा सवाल खोत यांनी उपस्थित केला. राजू शेट्टी माझ्यावर आरोप करतात. या देशात न्यायव्यवस्था आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात जावं. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.