महाराष्ट्रराजकारण

लॉकडाऊन हटविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..  

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे अजूनही अनेक ठिकाणी लॉकडाऊन कायम आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक उद्योगांना मोकळीक दिली असली तरी, लॉकडाऊनचे निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आलेले नाही.

यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहे. राज्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे सध्यातरी लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित सहभागी झाले होते.

बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती तसेच लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची कुठलीही घाई नसल्याचे स्पष्ट केले. पुढे त्यांनी असेही सांगितले की, ज्या ठिकाणी लॉकडाऊन हटवण्याची घाई करण्यात आली. तिथे पुन्हा लॉकडाऊन केले गेले पाहिजे, असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले आहेत.

राज्यातील जनतेमध्ये कोरोनाबातत बराच संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाची पहिली लाट आली आहे, मात्र आता दुसरी लाट येऊ द्यायची नाही. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यामुळेच राज्यात संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी, मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.