कृषीमहाराष्ट्र

कांदा निर्यात बंदीबाबत फेरविचार करा- शरद पवार

मोदी सरकारने अचानक कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यावर पियूष गोयल यांनी कांदा निर्यात बंदीबाबत पुर्नविचार करू, असे आश्वासन शरद पवार यांना दिले. अशी माहिती पवार यांनी ट्विटरद्वारे दिली.

कांद्यावर निर्यात बंदी लावल्यावर पवार यांना विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी संपर्क केला. यावर केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केल्याची माहिती पवार यांनी दिली.

आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती त्यांनी सांगितली. बैठकीत प्रामुख्याने कांदा उत्पादक जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक असल्याचे पवार यांनी सांगितले. निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.