महाराष्ट्रलक्षवेधी

रियाच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार

अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणात उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला. दरम्यान, रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आपल्या अशिलावर ड्रग्ज प्रकरणात कबुली देण्यासाठी नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरोने दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना आढळलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीचा सहभाग असल्याच्या संशयावरून एनएसबीने तिला ताब्यात घेतले. न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रियाची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली.

रिया व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. सत्र न्यायालयासमोर युक्तिवाद करताना रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कबुली देण्यासाठी एनएसबीने आपल्या अशिलावर प्रचंड दबाव आणल्याचा आरोप केला. रियाची अटक गरजेची नसतानाही तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणले गेले. मुळात या सर्व प्रकरणात रिया चक्रवर्तीला फसवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. आता तिला जामीन मंजूर होणार की नाही हे लवकरच समजेल.