खेळमहाराष्ट्र

महेंद्रसिंग धोनीला पाकिस्तान खेळाडूकधून मानवंदना

१५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीचा चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी सुरैश रैना यानेही धोनीनंतर अवघ्या काही तासांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

पाकिस्तानचा दमदार फलंदाज बाबर आझम याने धोनीला ट्विटच्या माध्यमातून मानवंदना दिली. “धोनी, तू घडवलेल्या समृद्ध अशा क्रिकेट कारकीर्दीबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन तुझे नेतृत्वकौशल्य, लढाऊवृत्ती आणि खेळातील प्रतिभा कायम लक्षात ठेवली जाईल. तुझ्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा”, असे ट्विट करत बाबर आझमने धोनीला सलाम केला.

भारतीय संघाला टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात करत २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला.

धोनीच्या यशस्वी कारकिर्दीला चहूबाजुनी सलाम करण्यात येत आहे. क्रीडा, राजकारण, सामाजिक क्षेत्र, बॉलिवूड साऱ्याच क्षेत्रांतून धोनीच्या योगदानाला सलाम करण्यात आला आणि त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, रवी शास्त्री आणि परदेशी खेळाडूंनीही धोनीच्या क्रिकेटमधील योगदानाला सलाम केला.