आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्रलक्षवेधी

भाकरीचे पीठ विकून मुलाला पुस्तके घेऊन देणाऱ्या सावित्रीचा लेक झाला उपजिल्हाधिकारी

Newslive मराठी-  हाता तोंडाशी गाठ पडावी म्हणून गिरणीत दळणासाठी गेलेल्या सरुबाई भंडारे यांना भाकरीपेक्षा पोरगा सिध्दार्थसाठी पुस्तक महत्त्वाच वाटले. तिने ते पीठ विकून पुस्तके आणली. आज तिचा लेक उपजिल्हाधिकारी बनलाय. तो चांगलं काम करतोय हे कानावर पडल्यावर त्या एकवीसाव्या शतकातल्या सावित्रीचं काळीज सुपाएवढं होतंय. ही यशकथा आहे उपजिल्हाधिकारी सिध्दार्थ भंडारे या मजुराच्या पोराची!

सिद्धार्थ भंडारे सध्या चांदवडचे उपविभागीय अधिकारी आहेत. डोंगरखंडाळा (बुलढाणा) येथील मागासवर्गीय घटकातील वसंता आणि सरुबाई या दाम्पत्याचा मुलगा. उत्पन्नाच साधन नसल्याने कुटुंब मजुरी करायचे. सरुबाई रस्त्याच्या कामावर खडी फोडायला जायची. स्वतः मजुरी करीत असले तरी त्यांची मुले उषा आणि सिध्दार्थ यांना मात्र त्यांनी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवले.

सिद्धार्थ भंडारे सध्या चांदवडचे उपविभागीय अधिकारी आहेत. डोंगरखंडाळा (बुलढाणा) येथील मागासवर्गीय घटकातील वसंता आणि सरुबाई या दाम्पत्याचा मुलगा. उत्पन्नाच साधन नसल्याने कुटुंब मजुरी करायचे. सरुबाई रस्त्याच्या कामावर खडी फोडायला जायची. स्वतः मजुरी करीत असले तरी त्यांची मुले उषा आणि सिध्दार्थ यांना मात्र त्यांनी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवले. शाळेत मिळणारे ग्लासभर दूध बहिण उषा स्वतः न घेता भाऊ सिद्धार्थला देत असे. असं केल्याने एकदा सिद्धार्थला वर्गातून बाहेर काढण्यात आले होते. प्रारंभी जन्मनोंद नसल्याने त्यांचा शाळा प्रवेश शिक्षकांनी नाकारला होता. अतिशय खडतर आयुष्य वाट्याला आलेल्या या दांपत्याच्या आयुष्यात जशी जगण्याची आव्हाने होती तशी त्यांच्या मुलांना शाळेत शिकतानाही वाट्याला आलीच.

सरूबाई स्वत: निरक्षर होत्या. मात्र त्यांना शिक्षणाचे महत्व कळले होते. त्यामुळे सुरवातीला दुसऱ्याच्या शेतावर मजुरीला जात असल्या तरी त्यांनी मुलांना वेगळा मार्ग दाखवला. शाळेत पाठवले. शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. म्हाताऱ्या आई-बापाला रानावनात राबताना बघून सिद्धार्थला देखील त्याच महत्त्व कळले. त्याने लहानपणापासुनच अभ्यासासाठी खूप कष्ट उपसले. त्यापासुन लक्ष ढळू दिले नाही. एकदा तर सरुबाई धान्य दळायला गेल्या. पीठ घेऊन बाहेर पडताना त्याना मुलाच्या पुस्तकाची आठवण झाली. त्यांनी ते पीठ विकले आणि पुस्तक खरेदी करुन मुलाला दिले. बारावीनंतरच सिद्धार्थ यांनी स्पर्धा परिक्षेवर लक्ष्य केंद्रीत केले.

अभ्यासाची कास धरलेल्या सिध्दार्थ यांनी प्रारंभी टपाल कार्यालयात काम केले. त्यानंतर त्यांची पोलीस शिपाई म्हणून निवड झाली. या पदावर काम करतानाच त्यांनी यशवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सिध्दार्थ यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास केला. त्यात पहिल्याच प्रयत्नात ते राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आईच्या कष्टाचे चीज झाले. मजुरी करणाऱ्या एकवीसाव्या शतकातल्या सरुबाई यांनी मजुराच्या पोराला उपजिल्हाधिकारी घडवून सावित्रीचा वारसा खऱ्या अर्थाने जागवला.

सिद्धार्थ भंडारे तरुणांचे आदर्श-
सिद्धार्थ भंडारे यांचा मजुराच पोर ते उपजिल्हाधिकारी प्रवास अनेक युवकांना प्रेरणा वाटतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. या अनुषंगाने सध्या ते राज्यभरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. चांदवड येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी ‘सिपीएल’ अर्थात चांदवड प्रीमियर लीग स्पर्धा भरवली. ग्रामीण भागातील खेळाडूना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मुलांच्या अभ्यासात गरिबी आड येऊ नये म्हणून त्यांनी आपल्याच कार्यालयात मोफत अभ्यासिका सुरु केली आहे.