महाराष्ट्रराजकारण

राज्यसभेतील कृषी विधेयकांवरुन झालेल्या गोंधळावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

राज्यसभेत कृषी उत्पादने व्यापार व वाणिज्य आणि शेतकर दरहमी ही विधेयके आवाजी मतदाराने मंजूर झाली. ही विधेयकं राज्यसभेत मांडल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. यावेळी कृषी विधेयकाच्या विरोधात विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला आणि रुल बुक फाडण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केली.

निलंबित खासदार संसदेच्या प्रांगणातील गांधी पुतळ्यासमोर अन्नत्याग केला. याचाच धागा पकडत राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. सदस्यांनी अन्नत्याग केला असून मी देखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

उपाध्यक्षांनी सदस्यांचे ऐकायला हवे होते, पण तसे न करता, आवाजी पद्धतीने मतदान घेतले गेले. त्यामुळे सदस्यांची नाराजी साहजिक आहे. सदस्यांनी संसदेच्या आवारात सदस्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मी नव्हतो ही गोष्ट खरी, पण बाकीचे आमचे सहकारी सभागृहात उपस्थित होते. सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते. पण ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता, अशी टीका पवार यांनी केली.