महाराष्ट्रराजकारण

शिवसेनेशी युती ही मोठी चूक- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेने बरोबर युती करून चूक झाली असेही ते म्हणाले. तसेच नरेंद्र मोदी यांनी व्यवस्थात्मक बदल करीत भारताला जगात अग्रेसर करण्याचे कार्य हाती घेतले असल्याचे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गरीबकल्याण हा त्यांच्या निर्णयांचा कणा असतो असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपने आयोजित केलेल्या सेवा सप्ताह व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय नेते व्ही.सतीश, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा तसेच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यावेळी उपस्थित होते. गरीब कल्याणाचा एक मोठा कार्यक्रम मोदी यांनी यांनी हाती घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत योजना, जनधन अशा अनेक योजनांतून त्यांनी अर्थव्यवस्थेत गरिबांना सामावून घेतले आणि भारत ११ व्या क्रमांकावरून जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थेत आला. ही त्यांची दूरदृष्टी आहे.

नरेंद्र मोदी हे एक कणखर नेतृत्व आहे. केवळ बोलणारे नाही, तर काम करून दाखविणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताचा उज्ज्वल काळ आहे. या वेळी भाऊ तोरसेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. राज्यभरात मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह राबवला जाणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.