महाराष्ट्रराजकारण

शिवसेना खासदार संजय जाधव यांचा राजीनामा!

परभणी । शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी खारदारकीचा राजीनामा पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणामुळे शिवसैनिकांची कोंडी होत असून, त्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये घुसपुस सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्‍न बाजार समिती हे या वादाचे मूळ आहे.

जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही समितीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भरणा असलेले प्रशासकीय मंडळ, ६ महिन्यांपूर्वी नियुक्‍त करण्यात आले होते. यामुळे हा वाद वाढला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. पुढील वेळी संधी मिळेल, अशी त्यांची समजूत काढण्यात आली होती.

परंतु पुन्हा या बाजार समितीवरील प्रशासक मंडळालाच मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे बंडू जाधव संतापले आहेत. शिवसैनिकांना न्याय मिळवून देता येत नसेल तर खासदारकी काय कामाची, असे जाधव यांनी म्हटले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीत राजकारण रंगले असून उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे लवकरच समजणार आहे.