महाराष्ट्रराजकारण

शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडायला भाग पाडले- खासदार संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी विधेयकावरून गोंधळ सुरू आहे. कृषी विधेयकाच्या विरोधात अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. आता एनडीएचे भाजपसोबत जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत. तसंच आम्ही बाहेर पडलो म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं असाही गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

कृषी विधेयकाबद्दल बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, या विधेयकामुळे शेतकऱ्यांना नुकसान होईल आणि व्यापाऱ्यांचा फायदा होईल असं सर्वांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील नेत्यांसह शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, आम्ही अजुनही जुने संबंध विसरू शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्वाचा स्तंभ होतो. एनडीएमध्ये कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला पाहिजे होती. सर्वपक्षीय तर दूरच पण एनडीएत कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय घेतले जात असतील तर धोरणात्मक चर्चा होणं आवश्यक होतं, असेही राऊत म्हणाले.