बातमी

धक्कादायक – १३ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून क्रूरपणे हत्या

Newsliveमराठी – मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनामुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांसह शरीराच्या इतरही अवयव कापल्याची भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकरिया गावात मुलीच कुटुंब राहते. मुलगी शौचासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ऊसाच्या एका शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, यात ऊसाच्या शेताचा मालक असलेल्याचाही समावेश आहे.