कोरोनादेश-विदेश

धक्कादायक – करोना बळींच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी

Newsliveमराठी – जगात करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून देशात दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे.

काल भारतात करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत ९३४ इतकी भर पडली. या वाढीसह देशातील एकूण करोनाबळींची संख्या ४७ हजार ६५ इतकी झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

भारता आधी अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सीकोचा क्रमांक लागतो. १३ दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावर पोहचला होता. दररोज होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे भारत आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे.

वर्ल्डोमीचरच्या आकडेवारीनुसार, भारतात ४७ हजारांपेक्षा जास्त जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ब्रिटनमध्ये ४६ हजार ७०६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. काल भारताने ब्रिटनला मागे टाकत चौथा क्रमांक गाठला आहे.