महाराष्ट्रराजकारण

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचा प्रश्न सुटण्याची शक्यता; शरद पवार यांनी दिले आश्वासन

अनेक दिवसांपासून रखडलेल्या
सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्ग, तेरणा साखर कारखान्याबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सकारात्मकता दाखवत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पक्षाच्या जिल्हा शाखेला दिले आहे. रोजगार हमीतून योजनेतून उस्मानाबाद सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करावा, जिल्हा बँक, तेरणा कारखान्याचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी उस्मानाबाद राष्ट्रवादीच्या शिस्तमंडळाने पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे साकडे घातले होते.

या शिष्टमंडळाने खासदार पवार यांची भेट घेत या मागण्या मांडल्या. जिल्हा शाखेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजाभवानी देवस्थान रेल्वे नकाशावर यावे या करिता सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली असून २०१९ च्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची खूपच कमी तरतूद केली होती. त्यामुळे सर्वकाही रखडले होते.

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाचा जास्तीत जास्त भाग राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याची तयारी दर्शवली, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा विकास प्रकल्प मार्गी लागु शकतो. अनेक दिवसांपासून हा प्रकल्प रखडला आहे.