महाराष्ट्रराजकारण

सोनिया गांधी यांनी सादर केला राजीनामा, मात्र…  

काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत कलह सुरू झाला आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देणारं पत्र कार्यसमितीकडे सोपवलं असल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. मात्र, पक्षाचं नेतृत्व करत राहावं, अशी विनंती डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली आहे.

अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या मागणीबरोबरच सोनिया गांधी यांनी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी सूचनाही काँग्रेस नेत्यांना केल्याची माहिती पुढे आली आहे. खरंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी या महत्त्वाच्या बैठकीआधी सोनिया गांधी यांना पत्र लिहलं होतं. त्यामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा अशी मागणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमिवर आज काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

बैठकीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहे. या आरोपांनंतर अनेक नेते दुखावले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला आता वादळी स्वरुप प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पक्षाला मदत करण्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी तर थेट राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. यामुळे आता नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.