कोरोनामहाराष्ट्र

उद्यापासून एसटी बस वाहतूक सुरू होणार!

कोरोनामुळे सध्या एसटी बस बंद आहेत. साथीच्या पार्श्वभूमीवर देशासोबतच राज्यातही अनेक महत्त्वाच्या सेवांवर निर्बंध घातले गेले. त्यामुळे जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा असे दोन्ही प्रकारचे प्रवास बंद झाले. त्यासोबतच गेल्या ५ महिन्यांपासून राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक बंदच असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

अखेर राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी दिली आहे. येत्या २० ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून ही एसटी वाहतूक सुरू होणार आहे. अवघ्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

सध्या एसटीमधून सामान्य प्रवाशांची वाहतूक करता येत नाही. मात्र, उद्यापासून ही वाहतूक करता येणार असून त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसेल. ई-पास किंवा कोणताही परवाना काढण्याची आवश्यकता भासणार नसून आवश्यक त्या गोष्टींचं पालन करून हा प्रवास करता येणार आहे.

इतर खासगी वाहनांना ई पास आवश्यकच असणार आहे. एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशांना परवानगी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन अशा प्रकारच्या नियमांचं पालन प्रवाशांना करावं लागेल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.