बातमीलक्षवेधी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसांत बसवणार!

Newsliveमराठी – बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा हटवण्याचे संतप्त पडसाद महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये रविवारी पाहायला मिळाले.

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन आणि मनगुत्ती गावात दिवसभर ठिय्या आंदोलन केल्याने तणाव निर्माण झाला होता. मनगुत्ती मधील मराठी भाषकांनी पुतळा बसवण्यासाठी आंदोलन केल्याने त्याची गंभीर दाखल कर्नाटक शासनाने घेतली.

गावातील मान्यवरांशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी व हुक्केरीचे तहसीलदार यांनी चर्चा केली. सायंकाळी त्यांनी पुतळा आठ दिवसात सन्मानाने बसवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

याची कार्यवाही झाली नाही तर नवव्या दिवशी पुतळा गावकरी उभारतील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला. मनगुत्ती गावातील शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून रातोरात काढला होता.

दुसऱ्या एका गटाने तक्रार केल्याने पुतळा हटवल्याचे कर्नाटक प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र हा पुतळा काढल्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शासनाच्या कोणत्या भूमिकेविरोधात आवाज उठू लागला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुतळा पुन्हा बसवण्याचे आवाहन केले आहे.