महाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षक दिसताच विद्यार्थी, गुरुजी शाळा कधी सुरू होणार?

शाळा बंद होऊन आज तब्बल दीडशे दिवसांचा कालावधी झाला आहे. आता विद्यार्थ्याला शाळेत जाण्याची उत्सुकता आहे. पालक सुद्धा सकारात्मक दिसून येतात. पण कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे. संचारबंदी असल्याने बिनधास्त गावाबाहेर नातेवाईकांना भेटायला जाणे शक्य नाही. मुले-मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात, खेळण्यात इतके बेभान झालेत कि ते आता आई-बाबा, आजी-आजोबा यांना ऐकत नाही अशा तक्रारी वाढू लागल्यात.

परिणामी पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे. गावात, रस्त्यात, घराजवळ शिक्षक दिसताच विद्यार्थी गुरुजी, शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न करीत आहे. विसोरा येथील शेकडो विद्यार्थी तथा पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाने बंद असलेली शाळा पुन्हा सुरू झाल्यास आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का यावर विद्यार्थी आणि पालकांनी अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेला कोरोना लॉकडॉऊन दिवसेंदिवस अनलॉक होत असला तरी शाळा त्याला अपवाद ठरत आहे. एकूणच आजघडीला विद्यार्थ्यांना तब्बल पाच महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत. भविष्यात सुट्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी परिस्थिती नाही. यादरम्यान विद्यार्थी शाळेतील शिक्षणापासून दूर आहे. ऑनलाईन शिक्षण चालू आहे पण त्यात ग्रामीण विद्यार्थी, पालक भरडले जात आहेत. वास्तवात पालक केवळ आणि केवळ ऑफलाईनला पसंती देत आहेत.