देश-विदेशमहाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दिली एक रूपयाची दंडाची शिक्षा

प्रशांत भूषण यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानना खटल्याच्या शिक्षेकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल आज जाहीर केला. मागील सुनावणीच्या वेळी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी मागील सुनावणीत न्यायालयाला केली होती.

आज सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना एक रुपया दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची ही रक्कम १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिने तुरूंगवास आणि तीन वर्षे वकिली करण्यावर बंदी असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

या वर्षीच्या जून महिन्यात प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयावर दोन ट्विट केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याची स्वतःहोऊन दखल घेत न्यायालयाची अवमानना केल्या प्रकरणी प्रशांत भूषण यांना दोषी ठरवले होते. विशेष म्हणजे अवमानना प्रकरणी शिक्षा ठोठावणारे न्यायमूर्ती अरूण मिश्रा २ सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत.