महाराष्ट्रराजकारण

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेत कायम सक्रिय असतात. यासाठी त्यांना अनेकदा पुरस्कार देखील मिळाले आहेत. देशात कोरोनाचं संकट असतांना सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू झालं. त्यात पहिल्याच दिवशी खासदार सुळे यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारला. देश सध्या आर्थिक संकटात आहे. तरूणांना रोजगार नाही त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र तसं होतांना दिसत नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

लॉकडाऊनमुळे सगळा देश अडीच तीन महिने बंद होता. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला आहे.

यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. परंतु असं होताना दिसत नाही असंही सुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी प्रश्नोत्तराचा तास कमी करून तो फक्त अर्धातासच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कमी वेळात प्रश्न मांडून त्याचं उत्तर सरकारकडून मिळवण्याचं आव्हान सर्वच पक्षांच्या खासदारांपुढे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन लवकर संपणार आहे.