महाराष्ट्रशैक्षणिक

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; MPSCची परीक्षा पुढे ढकलली

राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी आणि ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. तसेच या परीक्षेची पुढील तारीख चर्चा करून घोषित केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती.

त्यामुळे एमपीएससीची ११ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एमपीएससीला माहिती देण्यात आली आहे. आता एमपीएससीशी बोलून परीक्षेची पुढची तारीख जाहीर केली जाईल. मात्र या तारखेला निश्चितपणे परीक्षा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्यानंतर ११ ऑक्टोबरला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेविरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता.

ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झालेले संभाजीराजे छत्रपती यांनीही परीक्षा रद्द न झाल्यास एमपीएससीच्या केंद्रे ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. दरम्यान एमपीएससीची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या नेत्यांशी गुरुवारी दीर्घ चर्चा केली होती. या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.