महाराष्ट्रराजकारण

सरकार तुमच्यासोबत आहे, आंदोलन करू नका; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. या निकालाबाबत मराठा समाजाच्या ज्या भावना त्याच राज्य सरकारच्या देखील आहेत. मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. आक्रमकपणे आणि चिवटपणे ही कायदेशीर लढाई लढली जाईल. सरकार तुमच्यासोबत आहे, त्यामुळे कोरोनाच्या संकटात रस्त्यावर उतरत आंदोलन, मोर्चे काढू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला भावनिक साद घातली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना कोरोना, मराठा आरक्षण व इतर विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, न्यायालयायात युक्तिवाद करताना सरकार अजिबात कमी पडले नाही. आधीच्या सरकारने जे वकील दिले होते तेच कायम ठेवले होते. त्यात आणखी वकीलांची भर घातली होती. इतर राज्यांप्रमाणे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या बेंचसमोर व्हावी अशी मागणी राज्याने केली होती.

मागणी मान्य करताना न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस अंतरीम स्थगिती दिली. इतर राज्यांच्या बाबतीत अशा प्रकारे स्थगिती दिलेली नाही. अशी स्थगिती देण्याची आवश्यकता नव्हती. असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. यावर लवकरच तोडगा काढू असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.