महाराष्ट्रराजकारण

ज्या पक्षाची ताकद जास्त, त्याला अधिक जागा- शरद पवार

टिम Newslive मराठी:  सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाआघाडीनंतर जागावाटप करताना ज्या राज्यांत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे, त्याला अधिक जागा दिल्या जातील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होईल. शिवाय मित्रपक्षांनाही सोबत घेतलं जाईल. जागावाटपासंदर्भात कुठलाच संभ्रम नाही. असल्यास तो दोन्ही पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून दूर करतील, असंही ते म्हणाले.

सत्तेवर येण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. मात्र आमचं सरकार सत्तेवर आल्यास शेजारच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांप्रमाणेच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.

दरम्यान, राज्याचं नेतृत्त्व विदर्भाकडे असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र ती पूर्णपणे फोल ठरली असून सर्वच बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.