महाराष्ट्रराजकारण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ‘असे’ असणार

कोरोनाचे थैमान सध्या सर्वत्र सुरूच आहे. यातच महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 7 आणि 8 सप्टेंबर हे दोन दिवस अधिवेशन होणार आहे. 3 ऑगस्टला हे अधिवेशन घेणं अपेक्षित होतं पण कोरोनाच्या संकटामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सप्टेंबरमध्ये 6 महिने पूर्ण होतील. दोन अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक अंतर ठेवता येत नाही. त्यानुसार कोरोनाचं संकट असलं तरी राज्य सरकारला अधिवेशन घेणं अनिवार्य आहे. यासाठी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत फक्त दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यंदाचं अधिवेशन हे इतर अधिवेशनांपेक्षा वेगळं असणार आहे.

या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या आमदारांवर बंधनं घालण्यात आली आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव आमदार आणि मंत्र्यांना RT-PCR ही चाचणी करणं बंधनकारक आहे. यासाठी ५ आणि ६ सप्टेंबरला मुंबईच्या विधानभवन परिसरात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमदार आणि मंत्र्यांसाठी या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा प्रकारच्या अटी घालण्यात आल्या आहेत.