महाराष्ट्रराजकारण

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून 2 दिवस होणार पावसाळी अधिवेशन

कोरोनाने महाराष्ट्रभर हाहाकार माजवला आहे.यातच महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.

बैठकांमध्ये कोरोना परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सर्व सदस्यांची कोरोनासाठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय देखील घेण्यात आला आहे.