आंतरराष्ट्रीयबातमीराजकारण

गेल्या चार वर्षात लोकायुक्त न नेमण्याचे कारण कळेल का- आण्णा हजारे

Newslive मराठी:  केंद्र सरकारचा आदेश असूनही गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात लोकायुक्त नियुक्ती का करण्यात आली नाही, याचे कारण जनतेला कळेल काय,’ असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.

लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी पूर्वीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र पाठविले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, लोकपाल व लोकायुक्त कायदा झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य सरकारांना पत्रे पाठविली आहेत. त्यानुसार राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याची जबाबदारी त्या त्या राज्य सरकारवर सोपविण्यात आली आहे. आपणही पूर्वी महाराष्ट्रात पहिला सक्षम लोकायुक्त नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. असे असूनही आतापर्यंत ही नियुक्ती का झाली नाही, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे.’