कृषीमहाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊस गाळप हंगाम ऑक्‍टोबरपासून होणार सुरू

राज्यात कोरोनामुळे सर्वकाही बंद आहे. मात्र साखर कारखाने बंद करून चालणार नाही. ऊस गाळप हंगाम यंदा ऑक्‍टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखान्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याचा आराखडा साखर आयुक्तालयाकडून तयार करण्यात येणार आहे.

ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्याची जबाबदारी साखर कारखान्यांवर सोपवण्यात आली आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगाम 180 कारखाने गाळप करतील, असा अंदाज आहे. त्यासाठी हजारो कामगार ऊस तोडण्यासाठी घराबाहेर पडणार आहेत. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने साखर आयुक्तालयाने आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला.

कारखान्यांनी कोणकोणत्या सुविधा पुरवाव्यात आणि कामगारांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. त्यानुसार कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवणे, त्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, औषधोपचार करण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्या आहेत. प्रत्येक कारखान्याने कोविड सेंटर भरावे अशी सूचना या अगोदरच शरद पवारांनी केली आहे.