कोरोनामहाराष्ट्र

नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता- राजेश टोपे

मार्च महिन्यापासून लागलेला लॉकडाऊन अजूनही सुरूच आहे. तब्बल सात महिने उलटलेत, राज्याची वाटचाल अनलॉककडे सुरु तर आहे. मात्र अजूनही अनेक निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन या सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, त्याचबरोबर राज्यातील मंदिरांचे दरवाजे कधी खुले होणार, राज्यातील शाळा कधी खुल्या होणार आणि सिनेमागृह तसंच नाट्यगृह कधी खुली होणार हे प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अनलॉकबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं आहे. राजेश टोपे अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. कोरोनावर लस आलेली नाही. आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल. पुढील महिना म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे. राजेश टोपे म्हणालेत की, येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील मंदिरं, मशिदी आणि सर्वच धार्मिक स्थळं, व्यायामशाळा सुरु केल्या जातील. शाळा देखील सुरु करण्याचा विचार केला जातोय.

अशात येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व काही पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा करूयात. मात्र त्यानंतर आपल्याला काही नियम आणि शिस्त पाळावी लागेल. याचीही आठवण राजेश टोपे यांनी करून दिली. महाराष्ट्र राज्यातील कोरोना मृत्युदर कमी करण्याचं मोठं आव्हान सरकार समोर आहे. अशात येत्या काळात महाराष्ट्रातील मृत्युदर कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल असंही राजेश टोपे म्हणालेत.