कृषीमहाराष्ट्र

प्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट

पुणे-बेंगळुरू महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर किणी हे गाव आहे. या गावातील युवा शेतकरी सुमित दणाणे यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

एम.टेक (मेटॅलर्जी) पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कॉलेजमध्ये अधिव्याख्यातापदी नोकरी केलीआहे. परंतु शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच विचारातून त्यांनी नोकरी सोडून घरच्या शेतीला प्राधान्य दिले. अशोक दणाणे या अभियंता युवकाने नोकरी सोडून सेंद्रिय शेतीची दिशा धरली आहे. आरोग्यदायी शेती करण्याकडे त्यांचा कल आहे. सेंद्रिय शेतीला देशी गोपालनाची जोड दिल्याने उत्पन्नामध्ये देखील वाढ झाली आहे.

शेतीसाठी पुरेशा प्रमाणात शेणखत गोमूत्र उपलब्ध होण्यासाठी सुमित दणाणे यांनी पाच वर्षांपूर्वी दोन देशी गाई घेतल्या. याचवेळी गाईंच्या संगोपनाबाबत प्रशिक्षण देखील घेतले. गाईंसाठी दहा गुंठे क्षेत्रावर गोठा तयार केला. सध्या त्यांच्याकडे १३ देशी गाई आणि चार कालवडी आहेत. खिलार, गीर, हरियानवी थारपारकर या देशी गाईंचे त्यांनी संगोपन केले आहे.