महाराष्ट्रराजकारण

“…तर ‘मातोश्री’ समोर येऊन आंदोलन करू”!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. बऱ्याच लोकांच्या हाताला काम नाही त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. अनेक कंपन्या देखील बंद आहेत. अनेक व्यवसाय देखील अडचणीत आले आहेत.

यामध्ये कोरोनाकाळात लागू करण्यात आलेल्या डीजे बंदीमुळे साउंड सिस्टीम आणि लाईट मालक व कामगारवर्ग यांच्यावर देखील सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याही हाताला गेल्या अनेक महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे डीजे मालकांनीही सरकारपुढे काही मागण्या केल्या आहेत. रविवारी महाराष्ट्र राज्य छावा क्रांतिवीर संघटना आणि पुणे जिल्हा साऊंड सिस्टीम आणि लाईट असोसिएशनच्या जुन्नर व आंबेगाव तालुका कमिटीचा मेळावा आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे पार पडला.

यावेळी छावा क्रांतिवीर संघटना व साऊंड सिस्टीम आणि लाईट असोसिएशनने काही मागण्या ठेवत त्याची दखल न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. शासनाने राज्यातील साऊंड व लाईट मालकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे. डीजे मालकांचे कर्ज माफ करावे. राज्यात डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी, अशा मागण्या साऊंड सिस्टीम आणि लाईट असोसिएशननं सरकारकडे केल्या आहेत.

साऊंड सिस्टीम आणि लाईट असोसिएशनच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मुंबईत येवून मातोश्री समोर आंदोलन करू. जर सरकारला आमच्या मागण्या मान्य करायला जमत नसेल तर सरकारनं साऊंड मालकांचं साहित्य विकत घेवून आमची कर्ज माफ करावीत, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे. यावर सरकार काय निर्णय घेणार हे लवकरच समजणार आहे.