महाराष्ट्रराजकारण

….तरच मुंबई लोकल सुरू करू- पियुष गोयल

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जून-जुलैच्या दरम्यान अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामध्ये हळूहळू सर्व गोष्टी सुरु केल्या जात आहेत. येत्या काही दिवसात सिनेमागृहदेखील सुरु करण्याची शक्यता आहे.

मात्र अद्याप मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता प्रत्येक मुंबईकराला मुंबई लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गोयल म्हणाले की, राज्य सरकारच्या मागणीनंतरच मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल.

गोयल म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे जर आमच्याकडे प्रस्तावच आला नाही तर मुंबई लोकल सुरु करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्य सरकार आमच्याकडे प्रस्ताव पाठवेल तेव्हाच आम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ. पियुष गोयल यांच्या माहितीनंतर सर्वांना प्रश्न पडला आहे की, महाराष्ट्र सरकार मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव कधी पाठवणार.