मनोरंजनराजकारण

मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही, सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलं – अनिल देशमुख

Newsliveमराठी – सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत असून सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी संपूर्ण तपासात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून सर्वोच्च न्यायालयानेही तपासात दोष आढळला नसल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची बाब आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

“या सर्व प्रकरणी विरोधी पक्षातील नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या लक्षात ठेवून काही नेते राजकारण करत आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी योग्य तपास केल्याचं सांगितलं असून ते जास्त महत्त्वाचं आहे,” असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान राज्य सरकार न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं आहे .