बातमीमहाराष्ट्रलेख

असे मिळणार लातूरला पाणी

Newslive मराठी-  मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. काय असणार आहे हा प्रकल्प ? तर यामध्ये ११ धरणं ग्रीडद्वारे जोडली जाणार असून, पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.

मराठवाड्यात मागील सहा वर्षांपासून दुष्काळ पडत असल्यामुळे पाणी टंचाई वाढली आहे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. ‘शेतीचे पाणी, उद्योगाचे पाणी आणि पिण्याचे पाणी यांचा एकत्रित विचार करून ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्प सुरू केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी दहा हजार कोटी रुपये निधी खर्च होईल. पाच वर्षांत प्रकल्पावर अंदाजे २५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम ११ धरणे ग्रीडद्वारे जोडली जाणार आहेत,’ असे लोणीकर यांनी सांगितले.

जायकवाडी, उजनी, खडकपूर्णा, येलदरी, मांजरा, लिंबोटी, विष्णुपुरी, सिद्धेश्वर, माजलगाव, निम्न तेरणा, निम्म मनार, इसापूर या प्रमुख धरणांचा ग्रीड प्रकल्पात समावेश आहे. बंद पाइपद्वारे एका धरणातून दुसऱ्या धरणात पाणी वाहून नेले जाणार आहे. त्यामुळे खालच्या राज्यात वाहून जाणारे पाणी राज्यात अडवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी इस्त्रायलला शिष्टमंडळासह लोणीकर यांनी भेट दिली होती. इस्राईल सरकारची कंपनी आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार तज्ज्ञांनी वर्षभर मराठवाड्यातील पाऊस, सिंचन प्रकल्प आणि भूगर्भातील पाण्याचा सखोल अभ्यास केला. ही योजना यशस्वी होईल, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकल्पामुळे आता दरवर्षी ओस पडणारे मांजरा धरण भरणार असून त्यामुळे लातूरला येत्या ३ वर्षात पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली अनेक वर्षे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर गांभीर्याने तोडगा काढणे कुणालाही शक्य झाले नव्हते. मात्र राज्यातील फडणवीस सरकारने याविषयी पाठपुरावा करत भविष्याचा विचार करून तब्बल २५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे मराठवाडा आणि लातूरची तहान भागली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi