महाराष्ट्रलक्षवेधी

महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज, खंडणीची मागणी

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक तसंच निर्माते महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज मोबाईलवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकीचे मेसेज आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. धमकीचे मेसेज आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

महेश मांजरेकर यांना व्हॉटसॅपवरून हे धमकीचे मेसेज आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या मेसेजेसद्वारे 35 कोटीं रूपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकीचे मेसेज पाठवण्यात आले आहेत. अबू सालेम टोळीकडून महेश मांजरेकर यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून तपास सुरु आहे. एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्या व्यक्तीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपटात महेश मांजरेकर याचे अनेक भूमिका असलेले चित्रपट आहेत.