Newslive मराठी- 29 जुलै हा दिवस व्याघ्रदिन म्हणून साजरा केला जातो. विशाल नैसर्गिक अधिवास लाभलेल्या भारतात अनेक प्रकारचे वाघ सापडतात. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ हे भारतात आढळतात. काही वर्षांपूर्वी शिकार आणि इतर कारणांमुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांत वाघांची संख्या कमी होऊ लागली होती.
यावर सरकारने उपाययोजना करीत वाघांचं प्रमाण कसं वाढवलं जाईल याकडे लक्ष दिलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या दिवशी राज्यातील जनतेला व्याघ्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राची वनसंपत्ती ही मोठी आहे. ज्या जंगलात वाघ असतो तिकडचं निसर्गचक्र हे उत्तम मानलं जातं. त्यामुळे निसर्गाचं संतुलन कायम राखण्यासाठी वाघांची जोपासना करणं ही काळाची गरज आहे. सरकारसोबत नागरिकांचीही ही जबाबदारी आहे.
त्यामुळे व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत न राहता, निसर्गचक्र आणि पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं.
उत्तम छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनीही वाघांचे अनेक फोटो काढले आहेत. भारतात वाघांचा नैसर्गिक अधिवास ज्या ज्या ठिकाणी आहे, त्या त्या ठिकाणी 25 हजारांपेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले होते. यामध्ये 35 दशलक्षांहून अधिक छायाचित्रे घेण्यात आली. भारताच्या अगदी ताज्या व्याघ्रगणनेची ‘गिनीज् बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात आली आहे. सर्व छायाचित्रे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने स्कॅन करण्यात आली आहेत. आतापर्यंत जगातल्या ज्या ज्या देशांत व्याघ्रगणना झाली, त्यामध्ये सर्वात मोठय़ा प्रमाणावर वाघांची गणना करण्याचा कार्यक्रम भारताने पार पाडला आहे.