महाराष्ट्रराजकारण

काळ कठीण आहे, पहाटे ३ वाजताही कुणी कॉल केला तरी उचला- चंद्रकांत पाटील

सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा काळ कठीण आहे. सामान्य लोकांना मदतीची आवश्यकता असून प्रत्येक नगरसेवक, भाजपाच्या कार्यकर्त्यांना यात सक्रीय राहिलं पाहिजे. नगरसेवकांनी पहाटे ३ लाही लोकांचे फोन स्वीकारावेत, त्यांनी फोन बंद ठेवता कामा नये अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंदक्रात पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिली.

रविवारी रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, सध्याच्या या कठीण काळात लोकांना ऑक्सिजनयुक्त बेड्ची गरज आहे. त्यांना सर्व ताकदीनिशी मदत करा.शहरात रुग्णवाहिकांची कमतरता आहे.

खासगी कारमध्येही रुग्णवाहिका तयार करा. या गोष्टींना येणारा खर्च भाजपा करेल मात्र लोकांना अडचणी येऊ नयेत याची काळजी घ्या. सर्वसामान्य रुग्ण,ज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांची रुग्णालयातील बिले भरण्यास मदत करा. सरकारी दराप्रमाणे बिल दिले जातं आहे का याचीही खातरजमा करा. नागरिकांच्या मदतीसाठी एक विधानसभा एक घर अभियान राबवावं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी अनेक आमदार कार्यकर्ते उपस्थित होते.