कृषीमहाराष्ट्र

इंदापूरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नकाशा घेऊनच भरणेमामा मंत्रालयामध्ये

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्नावरून अनेक वर्ष राजकारण झालं. आता इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे सध्या बैठका घेत आहेत. त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांची तातडीने दुसरी बैठक घेतली.

इंदापूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, २२ गावातील पाण्याचा, लाकडी- निंबोडी उपसा सिंचन योजनेचे प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. प्रत्येक विधानसभेची निवडणूक पाण्याच्या प्रश्‍नावर गाजली आहे. आजपर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये पाणीप्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यामध्ये कालव्याच्या पाण्यासाठी व नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष केला आहे.

रास्ता रोको, उपोषणासारखी आंदोलने करून पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाणी न मिळाल्यामुळे हजारो एकरातील पिके जळून गेल्याचा इतिहास आहे. यामुळे उन्हाळ्यच्या अगोदर ही कामे पूर्ण झाली तर याचा फायदा होणार आहे.