बातमीमहाराष्ट्र

दूध उत्पादकांसाठीचे भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे- राजू शेट्टी

Newslive मराठी-  आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह महायुतीने आंदोलनात उडी घेतली आहे. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली.

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली.

जोरदार आंदोलन सुरु असताना राज्य सरकारच्या बचावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुढे आले आहेत. शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण, ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल’ असं म्हणत राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सदाभाऊ खोत यांनी देखील राजू शेट्टी यांच्या आंदोलनवेळी जोरदार टीका केली होती. यामुळे आता राजू शेट्टी यांनी देखील या भाजपच्या आंदोलनवर टीका केली आहे.