महाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंनी कोरोनाशी लढावे कंगनाशी नाही- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपानं सध्या बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या ते विविध भागांचा दौरा करून आढावा घेत आहेत. रविवारी बौद्धगया येथे झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांना महाराष्ट्रात गाजत असलेल्या मुद्यांसदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी भाष्य केले.

त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “आज महाराष्ट्रात करोना महामारीचं मोठं संकट आहे. आजघडीला १० लाखांपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आहेत. देशात करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी चाळीस टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात दिवसाला २३ ते २५ हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मला वाटतंय की आमच्या मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या संकटावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. राजकारण, कंगनाचा विषय किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडून नेव्ही अधिकाऱ्यावर झालेला हल्ला या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी करोनाशी लढाई लढावी. विरोधी पक्षासोबत किंवा कंगनासोबत नाही,” असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असतानाच अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या विधानांवरून राजकारण पेटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाषणात नाव न घेता भाजपा आणि कंगनावर टीका केली होती. यावर विचारलेल्या प्रश्नांवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत प्रत्तुत्तर दिलं आहे.