महाराष्ट्रराजकारण

‘आत्मनिर्भर भारत’साठी आभासी गेम्स, खेळणी उद्योगाने योगदान द्यावे- पंतप्रधान

आज आकाशवाणी वरील मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. मन की बात कार्यक्रमाचा हा ६८ वा भाग आहे. आत्मनिर्भर भारता’मध्ये आभासी गेम्स आणि खेळणी उद्योगालाही महत्त्वाचे योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. कॉम्प्यूटर आणि स्मार्टफोनसाठी नवनवीन कल्पना वापरून, आपल्या समृद्ध इतिहासावर आधारित भारतीय गेम्स तयार करणे आवश्यक आहे.

तसेच खेळण्यांच्या क्षेत्रातही मुलांचे बाल्य जपणारी, खुलवणारी पर्यावरणपूरक खेळणी देशात बनवण्याचे आवाहन त्यांनी देशातल्या युवकांना केले. मोदी म्हणाले की, लहान मुलांवर खेळण्यांचा मोठा प्रभाव असतो. नव्या शैक्षणिक धोरणात यावर लक्ष केंद्रित केल असून, खेळता खेळता शिकणं, खेळणी तयार करणं हा अभ्यासक्रमाचा भाग असेल. लहान मुलांसाठी भारतीय खेळणी तयार करून देशाला खेळण्यांच्या उत्पादनाचे एक मोठे केंद्र बनवण्याबाबत सध्या विचारविनिमय सुरू आहे.

देशात खेळणी तयार करून आपली परंपरा जपतानाच आपण आपलं उज्जवल भविष्यही साकार करू शकतो. ताळेबंदीच्या काळात आपल्या छोट्या बालमित्रांसाठी काय करता येईल याबाबत गांधीनगर इथल्या मुलांच्या विद्यापीठाशी आणि महिला बालविकास मंत्रालयाशी चर्चा केल्याचं मोदी म्हणाले.