कोरोनामहाराष्ट्र

विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार!

राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपुरातील आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली होती. ही मंदिरे लवकरच उघडण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन केले होते.

या आंदोलनामुळे पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले होते. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली. राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी सरकारने १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात येणार, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, आज मंदिर समितीनेच 30 सप्टेंबरपर्यंत मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतला.